‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत

- विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सचा वाढता प्रतिसाद
मुंबई, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशातून एकूण २९ हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही मुदत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
देशातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा, नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा विविध क्षेत्रांतील समस्यांवर प्रभावी उपाय सुचविण्याची संधी या माध्यमातून सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे.
या स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, उद्योजक, स्टार्टअप्स, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच विविध नवोपक्रम गटांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी जिल्हानिहाय पारितोषिकांचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवकल्पना प्रत्यक्षात आणू इच्छिणाऱ्या तरुणांना आपल्या कल्पना सादर करण्याची आणि त्यांना व्यापक स्तरावर ओळख मिळवून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. देशातील सर्वांत मोठ्या नवोपक्रम उपक्रमांपैकी एक म्हणून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीला आणि पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सनी ३० ऑक्टोबरपूर्वी मोठ्या संख्येने अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
अर्ज कसा करावा?
‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी इच्छुकांना https://sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करूनही अर्ज प्रक्रियेत सहभागी होता येईल. अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक माहिती नोंदवावी लागेल. त्यानंतर प्रकल्प सादर करताना आधारशी संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पासंबंधी आवश्यक तपशील भरावे लागतील. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संकेतस्थळावर चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ

